ठामपा आयुक्तांचे निर्देश
ठाणे: मेट्रो, एलिव्हेटेड कॉरिडॉर, कोस्टल रोड आणि रिंग मेट्रो यांसारख्या मोठ्या प्रकल्पांना महापालिकेकडून पुरविण्यात येणारे पाणी पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आले असून यापुढे या प्रकल्पांच्या कामांसाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून उपलब्ध होणारे प्रक्रिया केलेले पाणी वापरण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
पिण्यायोग्य पाण्याचा वापर केवळ अत्यावश्यक गरजांसाठी व्हावा, यासाठी महापालिका प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वॉशिंग स्टेशन, बांधकामे, उद्यानांमधील पाणी देण्याची कामे (गार्डनिंग) तसेच अन्य व्यावसायिक कारणांसाठी महापालिकेच्या पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यास सक्त मनाई करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात येणार आहेत.
अल निनोच्या संभाव्य धोक्यामुळे पुढील वर्षभरात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन ठाणे महानगरपालिकेने शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम, उपलब्ध पाण्याचे योग्य व्यवस्थापन, पाणीगळती व पाणीचोरीला आळा, अनधिकृत नळजोडण्यांवर कठोर कारवाई, पर्यायी जलस्रोतांचा विकास आणि नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण या बाबींवर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व संबंधित विभागप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक घेऊन पुढील ९ ते १० महिन्यांसाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश दिले.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त-1 प्रशांत रोडे, अतिरिक्त आयुक्त-2 मेजर डॉ. नितीन राठोड, नगरअभियंता सुरेंद्रकुमार काटकर, उपनगरअभियंता विनोद पवार, मोहन कलाल, शुभांगी केसवाणी, गुणवंत झांबरे यांच्यासह सर्व प्रभाग समित्यांचे सहायक आयुक्त उपस्थित होते. आगामी काळातील पाणीपुरवठ्याचे संभाव्य आव्हान लक्षात घेऊन प्रत्येक विभागाने आपापल्या कार्यक्षेत्रातील पाणीपुरवठ्याची स्थिती, उपलब्ध जलस्रोत, वितरण व्यवस्था आणि संभाव्य अडचणींचा आढावा घेऊन ठोस कृती आराखडा तयार करावा, असे निर्देश आयुक्तांनी दिले.
आगामी 30 जून 2027 पर्यंतच्या कालावधीसाठी दर 15 दिवसांचा कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. पाणीपुरवठ्यातील संभाव्य अडचणींचा अंदाज घेऊन त्यानुसार आवश्यक उपाययोजना राबविणे, पाण्याचे वितरण अधिक प्रभावी करणे आणि नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, याची दक्षता घेणे या बाबींना प्राधान्य दिले जाणार आहे. ज्या भागांमध्ये झोनिंग पध्दतीने पाणीपुरवठा केला जाईल त्याची पुर्वकल्पना नागरिकांना द्यावी. त्यामुळे नागरिकांना घरगुती वापरासाठी पाण्याचे नियोजन करता येईल. पाणीपुरवठ्यातील असमतोल दूर करून सर्व भागांना शक्य तितका नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे.
शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी अनधिकृत नळजोडण्यांचा प्रश्न गांभीर्याने हाताळण्यात येणार आहे. महापालिका क्षेत्रातील सर्व अनधिकृत नळजोडण्या शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
शहरातील टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यात पारदर्शकता आणण्यासाठी महापालिकेच्या सर्व टँकर्सचे जीपीएस मॅपिंग करण्यात येणार आहे. खासगी टँकर पाणी कोठून भरतात, त्यांचे फिलिंग पॉईंट्स कोणते आहेत आणि तेथून पाण्याचा उपसा कोणत्या पद्धतीने केला जातो, यावरही प्रशासनाकडून कडक नजर ठेवली जाणार आहे.
पाणीटंचाईच्या संभाव्य परिस्थितीत पर्यायी जलस्रोत उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक विहिरींचे पुनरुज्जीवन करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. शहरात एकूण ३५० सार्वजनिक विहिरी असून, त्यापैकी २०२ विहिरींचा वापर करणे शक्य असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. यापैकी पुनरुज्जीवित करण्यात आलेल्या ३५ विहिरी सध्या कार्यरत असून, उर्वरित विहिरींच्या स्वच्छता, दुरुस्ती आणि पुनरुज्जीवनाची कामे लवकरात लवकर हाती घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.